||श्री|| सहा ऋतूंचे सहा सोहाळे
- Dr. Vibhuti Salvi, M.D. Ayurved
- Jul 4, 2020
- 2 min read
आज कधी नव्हे ते पहाटेच जाग आली; ती सुद्धा गजर शिवाय. अजून वाहनांची म्हणावी तशी वर्दळ नव्हती. सर्वत्र निरव शांतता होती - बाहेरही आणि मनातही. असेच गुणगुणताना कानात शब्द ऐकू येत होते- “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे…सहा ऋतूंचे सहा सोहाळे येथे भान हरावे.“ शब्दांनी सुंदर समाधी लागली आणि मनात चिन्तन सुरु झाले.
अरे सहा ऋतू…कसे काय बुवा? आपल्याला तर तीनच ऋतू माहित आहेत. पाण्याचा shortage असलेला उन्हाळा, धोधो पाण्याने train बंद पाडणारा पावसाळा आणि AC बंद ठेवता येईल असा हिवाळा. तसे म्हटले तर वर्षाचे बारा ही महिने हल्ली water shortage असतो, ट्रेन्स कधीही बंद पडतात आणि फॅन तर कायमचा घरघरत असतो. त्यामुळे ऋतू बदलला हे CALENDER च्या महिन्यांशिवाय कळत नाही. सध्या तर कोरोनामुळे आख्खे जगच थांबले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव- खेड्यातल्या घरातही विषय एकच- कोरोनाचा …किती झाले? किती वाचले? किती गेले? आता पुढे काय? ह्या पलीकडे कोणालाही विचार करायला उसंतच नाही. त्यामुळेच की काय पूर्वी १३ जूनला धडकी देणारा पाऊस यंदा जुलैमध्ये बरसतोय याकडे आपले लक्ष नाही. हिवाळासुद्धा हल्ली जेमतेम एखादा महिना आल्यासारखा वाकुल्या दाखवतो आणि गायब होतो. उन्हाळा मात्र बिचारा चाकरमान्यासारखा सदाचाच असतो. कधी कमी कधी जास्त. सर्व ऋतूंचे गणितच जणू बिघडलंय.
हे ऋतूंचे गणित म्हणजे निसर्गाने काटेकोरपणे आखलेले चक्र आहे. प्रत्येक ऋतूचा ठराविक काळ, त्यात होणारे विशिष्ठ बदल- वातावरणातही आणि आपल्या शरीरातही! उदाहरणच द्यायचे झाले तर आता पावसाळा सुरु झाला की आपसूकच आजी आजोबांचे वाताचे गुडघे कुरकुर करायला लागतात. लहान मुलांच्या नाकातली सर्दी गळायला लागते. मग खोकला आहेच सोबतीला. पावसात भिजून आल्यावर येणाऱ्या शिंका आणि आल्याचा फक्कड चहा यांचे तर अतूट समीकरणच आहे.
आयुर्वेदशास्त्रात दिनचर्या व ऋतुचर्या यांचे विस्तृत वर्णन आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करावे? ऋतू बदलतो म्हणजे काय होते?, त्याचा शरीरावर कोणता व कसा परिणाम होतो? शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहार विहारात काय बदल करावेत? या सर्वांचे वर्णन यात आहे. ऋतुचर्येचे पालन केल्यास ऋतूबदलजन्य आजार उद्भवणारच नाहीत. Monsoon fever, viral infections, typhoidची साथ, अमुक तापाची साथ, तमुक रोगाची साथ, अशा उठसुठ येणाऱ्या साथी व दवाखान्याच्या बाहेर लागणाऱ्या रांगा यांची अनिष्ठ साथ संपेल
त्यामुळे ह्या सर्व साथींना बाय बाय करण्यासाठी आयुर्वेद सोबतीला हवाच! मग कोरोनाच काय त्याचा अजून कोणी नातेवाईक जरी आला तरीही आपण लढाईला तयार असू. आपणही मग या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करायला लागणार हे निश्चित. आयुर्वेदानुसार ६ ऋतू आहेत बरे!! सहजच आपले आठवले म्हणून सांगितले हो; उगाच घोळ नको. तर अशा ह्या सहा ऋतूंचे सहा सोहळे आणि आयुर्वेद ह्याचा आपण पुढील प्रकरणांमध्ये क्रमशः उहापोह करणार आहोत. तोवर असेच स्वस्थ राहा.. मस्त राहा..

Comments