चेहरा - निरोगीपणाचा आरसा
- Dr. Vibhuti Salvi, M.D. Ayurved
- Aug 4, 2020
- 3 min read

"मी कशाला आरशात पाहू ग
मीच माझ्या रूपाची राणी ग"
आरश्यासमोर उभे राहून कोणी आपल्याला बघत नाही याची खातरजमा करून स्वतःच्याच तोर्यात गुणगुणलेले हे शब्द बऱ्याच जणांना आठवत असतील. नुकत्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या षोडशवर्षीय मुलीला किंवा मिसरूड फुटलेल्या मूलाला तासंतास आरश्यासमोर उभे पाहुन आपले मनही नक्कीच भूतकाळात गेले असेल ना!
चंदेरी केसांची बट हळूच चेहऱ्यावर काढून सुरकुत्यांमधे उमटलेली हास्याची लकेर बरेच काही सांगून जाते. सुन्दर दिसणे, नटणे, सजणे, मुरडणे ह्या अगदी नैसर्गिक सहजसुलभ भावना आहेत. त्याला ना कोणत्या वयाचे बंधन, ना जातिधर्माचे. इतकेच काय तर स्री, पुरुष सर्वांनाच हे सारखे. कामावर जाताना दहा वेळा आरशात बघून भांग नीट पडलाय ना हे तपासणारे बाबा अणि किचन मधे काम करुन दमलेली तरीही जेवण वाढण्यापूर्वी चेहरा ठीकठाक करुन येणारी आई ; सुन्दर निटनेटके राहणे ही गोष्ट कोणीही टाळू शकत नाही.
शेक्सपियर म्हणून गेला- 'नावात काय आहे?' आम्ही म्हणतो- 'दिसण्यात काय आहे?' अरे काय आहे म्हणजे? दिसणेच तर "सबकुछ आहे". लहान बाळाचा चेहरा कोणासारखा दिसतो म्हणून वाद घालणारे आपण आणि वधुपरीक्षेतही चेहरा बघण्याचा कार्यक्रम करणारेही आपण! माझा चेहरा नितळ कसा होईल? त्या अमुक अमुक हीरोइन सारखी क्रीम वापरली तर मी गोरी होईल का? पार्लर मधे कोणता facial केला तर glow येईल चेहऱ्याला? असे अनेक प्रश्न आपल्या मनात अनेकदा येत असतात. अगदी शाहरुख खान ची advertise पाहून Fair & Handsome वापरणारे पुरुषही काही कमी नाहीत बरे! रोज मार्केट मधे नवनविन स्किन प्रोडक्ट्स येतच असतात. त्या प्रोडक्ट्सची उलाढाल ऐकून आपल्या चेहऱ्यावरचे खरखुरे रंग बदलतील हे निश्चितच. हे सर्व कशासाठी?? तर फक्त एका चेहऱ्यासाठी!!
हा चेहरा आपले प्रतिनिधित्व करतो. सुन्दर, हसरा, बोलका चेहरा आपल्या भावनांचा आरसाच असतो जणू. कोणावरही आपली छाप पाडून जातो तो आपला चेहराच. असा हा चेहरा अनेकदा शरीर आणि मनातही होणाऱ्या बदलांना सूचित करत असतो. फ़क्त चेहऱ्या कड़े पाहून आपले आरोग्य कळते. तर अश्या ह्या चेहऱ्याच्या बद्दल जरा जाणून घेऊया. चेहरा, त्याचा वर्ण, त्याचा पोत, त्याचा स्पर्श, उजळपणा हे सर्वच महत्वाचे आहेत. ह्याच्या कड़े नीट लक्ष दिल तर आपण चेहरा अधिक सुन्दर व आकर्षक ठेवू शकतो.
तारुण्यपीटिका/Acne/Pimples

चेहऱ्याच्या समस्यांमध्ये सर्वात प्रथम नाव येते ते म्हणजे Pimples किंवा मुरुमे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाउल टाकताना सर्वात जास्त त्रास कोणी देत असेल तर ते म्हणजे pimples. तारुण्यपीटिका, तारुण्यावस्थेत सुरु होणारे हे pimples चे सत्र काहींना मोठेपणीही त्राहि त्राहि करुन सोडते. चेहरा विद्रूप दिसणे, त्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव, मानसिकदृष्ट्या खचणे अश्या काही गंभीर समस्या हयामुळे उत्पन्न होतात. वयानुसार शरीरात होणारे हार्मोनल बदल, खाण्यामध्ये आम्बट तिखट चटपटित फ़ास्ट फ़ूड यांचा समावेश, cosmetics चा अति वापर, अपुरी झोप यांमुळे pimples चा त्रास अधिक बळावतो.
Pimples टाळण्या करता काय करावे ?
चेहरा दिवसातून २ वेळा कोमट पाणी व सौम्य साबणाने किंवा face-wash ने धुवावा. शक्यतो कृत्रिम रसायनांचा अति वापर टाळावा.
मेकअप चेहऱ्याला सूट होईल असाच निवडावा वा तो जास्त काळ चेहऱ्यावर राहणार नाही याची काळजी घ्यावी.
केसांचा कोंडा हे जर कारण असेल तर त्याची चिकित्सा प्रथम करावी
घरात बनलेले ताजे अन्नच खावे. तळलेले, आम्बट, तिखट, मसालेदार Chinese खाऊ नये. तसेच ready to cook किंवा preservatives घातलेले अन्न टाळावे.
योग्य मात्रेत पाणी प्यावे. शीतपेय पिऊ नयेत.
धूम्रपान, मद्यपान टाळावे.
नियमित योगासन वा प्राणायाम करावे. त्यामुळे शरीरातील विषार निघून जातात व शरीर मन प्रसन्न होतात.
pimples फोड़ू नयेत; अन्यथा ते अधिक ख़राब होऊ शकतात.
तेलकट त्वचा असणाऱ्यानी विशेष करुन आठवड्यातून किमान एकवेळा exfoliater किंवा scrub चा वापर करावा.
नैसर्गिक घटकांपासून निर्मित facepack दूध किंवा गुलाबपाण्यातून चेहऱ्याला आठवड्यातून किमान एकवेळा किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसार लावणे.
जायफळाचा पातळसर लेप pimples व त्याचे डाग कमी करतो
वांग/ Melasma/ Hyperpigmentation

चेहऱ्यावर दिसणारे वांग किंवा काळसर डाग हा तिशीनंतर जाणवणारा अजुन एक मोठा त्रास आहे. बाळंतपणामध्ये आलेले डाग नंतर काही वेळा निघून जात नाहीत. वयानुसार होणारे हार्मोनल बदल, तसेच sunburn मुळेही वांग उत्पन्न होतात. आयुर्वेदानुसार वातपित्तदोषघ्न आणि रक्तशुद्धिकर चिकित्सा यावर अति उपयुक्त आहे.
वांग टाळण्या करता काय करावे?
रक्तचन्दनाचा चेहऱ्यावर लेप आणि पोटातून त्याचा काढ़ा असा प्रयोग केल्यास चांगला परिणाम दिसून येतो
कुंकुमादि किंवा चन्दनबालालाक्षादि तेलाचा मुखाभ्यंग अर्थात चेहऱ्यावर हलकासा मसाज करणे
मोरावळा किंवा च्यवनप्राश सारख्या रसायनाचा नित्य वापर करणे
घरात बनलेले ताजे अन्नच खावे तळलेले आम्बट तिखट मसालेदार chinese खाऊ नये तसेच ready to cook किंवा preservatives घातलेले अन्न टाळावे
Dark circles

चेहऱ्यावर सर्वात सजीव असतात ते म्हणजे आपले डोळे पण ह्या डोळ्यांच्या भोवती असलेली काळी वर्तुळे डोळ्यांना निस्तेज बनवतात हे dark circles विशेषतः अपुरी झोप कामाचा ताणतणाव मोबाइल tv चा अति वापर यांमुळे येतात
Dark circles टाळण्याकरता काय करावे?
पुरेशी झोप योग्य वेळी घेणे.
शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे.
Antioxidants, minerals, vitamins यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असावा.
कुंकुमादि तेल किंवा चन्दनबलालाक्षादि तेल डोळ्यांच्या भोवतो हलक्या हाताने लावणे व गोलाकार दिशेने हलका मसाज करणे.
डोळ्यांवर निरश्या दुधाच्या घड्या ठेवणे.
डोळ्यांभोवती सारिवा चन्दन अशा शीत वर्ण्य औषधांचे लेप लावणे .
हे सर्व चेहरा निरोगी ठेवण्याकरता करावयाचे उपाय आहेत. परन्तु प्रत्येक व्यक्तिनुसार ह्यात फरक पडु शकतो. मुळात घरगुती उपाय करूनही फरक न पडल्यास जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडून सल्ला घेतलेला उत्तम. काही केसेस मध्ये तर्पण, नस्य, रक्तमोक्षण अशासारख्या पंचकर्माची जोड़ आवश्यक असते. थोडक्यात, योग्य आहारविहार, पुरेशी झोप, शांत व प्रसन्न मन आणि निरोगी जीवनशैली ही चेहऱ्याच्या निरोगीपणाची गुरुकिल्ली आहे.
आपल्या आयुष्यात अनेक चेहरे येत असतात. त्यापैकी काही चेहरे चांगली तर काही वाइट छाप पाडून जातात. दुसऱ्याच्या मनात आपला चेहरा चांगला म्हणून लक्षात राहावा हे मात्र आपल्याच हातात आहे हे अगदी खरे. तर मग त्या साठी आयुर्वेदानुसार उत्तम जीवनशैली बाळगा आणि आपला चेहरा प्रसन्न व आनंदी ठेवा...
Comments