top of page
Search

वर्षा ऋतुचर्या- आहार

“ऋतु हिरवा ऋतु बरवा , पाचुचा वनी रुजवा”

पावसाळा…. बच्चे कंपनी ते तरुणाई…. सर्वांचा आवडता ऋतु! पावसात भिजणे, थंडगार वातावरणात गरमागरम भजी आणि वाफाळता चहा घेणे, वेगवेगळ्या पिकनिक चे बेत… पावसाळा म्हटले की प्रत्येकाच्या अशा असंख्य आठवणी असतात…अगदी खास! ह्यावर्षी कोरोनामुळे बाहेर फिरण्याचे बेत जरी फसले तरी पावसाळ्याची रंगत आणि खवय्येगिरी मात्र मुळातच रसिक असणारा मनुष्य कसा विसरेल!!

असो. तर ‘नेमीची येतो पावसाळा’ या उक्तीनुसार हा पावसाळा किंवा वर्षा ऋतू आपल्यासोबत अनेक बदल घेऊन येतो. काळ्याभोर ढगांनी व्यापलेले आकाश, थंडगार तुषार उडवत बरसणाऱ्या धारा, अंगावर रोमांच आणणारा वारा, पावसाचे थेंब पिउन तृप्त झालेली धरती आणि सर्वत्र अवखळत तर कधी रोरावत वाहणाऱ्या नद्या… सृष्टीची सर्व रूपे अगदी जलमय झालेली असतात.

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानुसार आपल्या शरीरातही चिखलावत क्लेद संचित होतो. अतिरिक्त गारठ्याने जाठराग्नी मंद होतो. अम्लविपाकी आणि गढूळ पाण्याने पाचनशक्ती बिघडते पित्तदोषाचा चय होतो आणि वातदोषाचा प्रकोप.

वयस्करांचे कुरकुरणारे सांधे अधिकच त्रास देऊ लागतात. आमवात, संधिवात, गाठियावात, वातरक्त असे वाताचे व्याधी जोर धरतात. लहान मुलांना वरचेवर सर्दी पडसे आणि ज्वर उद्भवतो. याशिवाय पोटदुखी, जंत, भूक न लागणे हि लक्षणे सुद्धा आढळतात. भल्याभल्याना हतबल करणारा खरूज, नायटा असे बुरशीजन्य व्याधी पावसाळ्यात जोमात बळावतात. केस, त्वचा यांच्याही अनेक तक्रारी उत्पन्न होतात. एकंदरीतच काय; वर्षा ऋतू मध्ये दिसणाऱ्या इंद्रधनूच्या रंगांपेक्षाही अधिक व्याधी ह्या ऋतूमध्ये त्रस्त करतात. हे सर्व जर टाळायचे असेल तर वर्षा ऋतुचर्या पाळणे हे अपरिहार्य आहे.

ऋतुचर्या म्हटली की त्यात आहार विहार व पंचकर्म यांचा अंतर्भाव होतो. वर्षाऋतूमध्ये असणाऱ्या निसर्गस्थिती व शरीरातील दोषस्थिती नुसार आपल्या आहारमध्ये विशिष्ठ बदल करणे आवश्यक आहे.



  • जाठराग्नी मंद असल्यामुळे अन्न हलके व सुपाच्य असावे

  • तांदूळ भाजून केलेला बिना कुकरचा भात व मुगाचे वरण

  • नविन धान्याच्या ऐवजी जुने धान्य वापरावे

  • वाताची रुक्षता व शैत्य कमी करण्यासाठी उष्ण स्निग्ध पदार्थ जसे गरमागरम अन्नावर सोडलेली साजूक तुपाची धार

  • अल्प प्रमाणात आंबट व खारट चवीचे पदार्थ जसे चटण्या व लोणची - यामुळे वात कमी होतो व अग्नी प्रदीप्त होऊन भूक चांगली लागते. मात्र याचे प्रमाण जेवणात अगदीच अल्प असावे, भारदस्त बाईने लावलेल्या नाजूक कुंकवाच्या गंधाइतके!

  • कोकम, आमसूल ह्यांचा आंबटण म्हणून वापर करावा

  • नेहमीच्या मिठाऐवजी सैन्धवमीठ वापरावे

  • उकळलेले पाणी प्यावे. कोमट पाणी अति उत्तम..

  • दूध व दुधाच्या पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे; कारण ते पचायला जड़ असते

  • नेहमीच्या पालक, माठ यांसारख्या पालेभाज्या टाळाव्यात कारण पालेभाज्यांचा जमिनीतील मातीशी जास्त संपर्क येतो त्यामुळे त्यांच्या पानांमध्ये हजारो अतिसूक्ष्म जंतू असण्याची शक्यता असते विशेषतः आमांश जंत जुलाब लघवीच्या तक्रारी असणाऱ्यांनी पालेभाजी टाळलेलीच बरी. इतरांना खायचीच असेल तर त्यासोबत आले, लसूण, जिरे मिरे सुंठ हिंग मोहरी यांचा वापर असावा.

  • फक्त पावसाळ्यातच मिळणाऱ्या कोणत्याही निगराणीशिवाय निसर्गतः वाढणाऱ्या रानभाज्या मात्र आवर्जून खाव्यात आदिवासी जमातीचे प्रमुख अन्न असलेल्या या भाज्यांना तिथे देवाची कृपा म्हणून संबोधतात खतांशिवाय वाढलेल्या या भाज्या ऑरगॅनिक फूड लाही मागे टाकतील इतक्या उपयुक्त असतात टाकळा फोडशी करटुले भारंगी आघाडा घोळ कुडा अश्या कित्येक भाज्या बहुगुणी व तितक्याच चविष्ठ असतात मात्र खात्रीशीर व्यक्तीकडूनच त्या विकत घ्यावात

  • याव्यतिरिक्त मांसाहाराची सवय असणाऱ्यांनी मांसरस किंवा सूप/ stock घेण्यास हरकत नाही. मासे ताजे व सुकवलेले मात्र टाळावेत. तसेच मांसाहार शिजवण्यासाठी गरम मसाले वापरावे; जेणेकरून त्यांचे पाचन योग्य होईल. पावसाळ्यात असणाऱ्या मंद जठराग्निचा विचार करता मांसाहार पचायला जड़ जातो त्यामुळेच ह्या काळात येणारा श्रावणमहीना व विविध व्रतवैकल्ये यांचा विचार करता आपले भारतीय सणवार व आरोग्यशास्त्र यांची किती सुरेख सांगड घातली आहे ते लक्षात येते. त्याबद्दल पुनः कधी तरी बोलूच!

  • तळलेले, आम्बवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत

आमच्या एका वाद्विद्येच्या भोक्त्या स्नेहयाने ‘भजी पावसाळ्यात का खावी?’ यामागचे शास्रीय कारण सांगण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्यात उष्ण, स्निग्ध व हलके अन्न खावे असे म्हणतात तर भजी ही तेलात तळलेली असल्यामुळे उष्ण व स्निग्ध असते अणि तेलावर तरंगणारी असल्याने हलकी असते असा जावईशोध लावला होता.

यातला विनोदाचा भाग सोडला तर एक मात्र खरे की नेहमीच विविध रसांचे लौल्य बाळगणारी रसना म्हणजे जीभ पावसाळ्यात भारीच फाजिल होते. मग काय; सर्वत्र भज्या, बटाटेवड़े, फेन्या, पापड़, भाजलेल्या मक्यांची कणसे, खारे शेंगदाणे अशा फर्माइशी सुरु होतात. महिन्यातून एखाद्या वेळेला ठीक आहे हो1 पण असे पदार्थ नित्य सेवन केल्याने मंद झालेला जठराग्नि अजूनच मंद होऊन पोटाचे, वाताचे आजार उत्पन्न होतील. त्यातून ते पदार्थ बाहेरून विकत आणलेले असतील तर मग काय बोलावे!!

थोडक्यात, पावसाळ्याचा जर मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर घरी बनवलेल्या ताज्या, उष्ण, स्निग्ध, लघु आहाराशिवाय पर्याय नाही हेच ख़रे! म्हणून मस्त खा अणि स्वस्थ रहा….

जी गोष्ट आहाराची तीच विहाराची… त्याच्या बद्दल पुढील लेखात बोलूया.

 
 
 

Comments


  • facebook
  • youtube
  • generic-social-link

©2020 by Shri Vishwa-Amod Chikitsalaya and Panchakarma

bottom of page